लाडकी बहीण योजनेच्या KYC मध्ये मोठा बदल..हि कागदपत्रे अंगनवाडी सेविकांकडे जमा करावी लागनार ; राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता अशा महिलांसाठी शासनाने विशेष सुविधा सुरू करून दिली आहे.
यामध्ये संबंधित लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी. त्यानंतर शहानिशा करून त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. मात्र ३१ डिसेंबरपर्यंत त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पुर्तता लाभार्थी महिलांना करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. योजनेतील अपात्र महिलांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच या राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात. ई-केवायसीसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केला असल्यामुळे अनेक महिलांसमोर अडचण निर्माण झाली होती.
ज्या लाभार्थी महिलांच्या वडीलांचा मृत्यू झालेला आहे आणि पती देखील हयात नाहीत किंवा त्या महिलेता पतीसोबत घटस्फोट झाला आहे, अशा महिलांना ई-केवायसी पूर्ण करताना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक विधवा, निराधार आणि एकल महिलांनी या नियमाविरोधात नाराजी व्यक्त केली असून, शासनाने पर्यायी उपाय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर शासनाने अशा महिलांसाठी विशेष सुविधा तयार केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत वडील व पती दोघेही नसलेल्या, एकल, विधवा किंवा निराधार महिलांनाही हा लाभ कायम ठेवला आहे.
अंगणवाडी सेविकांकडे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करावी लागणार ही कागदपत्रे
लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करून पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची प्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करावी.
अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांचेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी.
त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे महिला व बाल विकास आयुक्तांमार्फत शासनास शिफारस करणार आहेत. दरम्यान, वडील आणि पतीही हयात नाहीत, घटस्फोटीत लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी आनंद खंडागळे यांच्याकडून करण्यात आले आहे.