बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रावर थेट परिणाम ; रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रावर आजपासून (ता. २३ ते २७) पर्यंत १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. किमान व कमाल तापमानात घसरण होताच हवेच्या दाबात वाढ होते. त्यामुळे या दिवशी थंडीचे प्रमाण अधिक राहील. किमान व कमाल तापमानात घसरण झाल्याने काही भागात विशेषतः उत्तरेकडील भागात थंडीची लाट जाणवेल.
तर उद्या (ता. २४) मंगळवार (ता. २५) व शुक्रवारी (ता.२८) थंडीचे प्राबल्य कमी होऊन सौम्य थंडी जाणवेल. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असे हवामान राहील.
चक्रीवादळ तयार होतंय
बुधवारी (ता.२६) बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन लहान चक्रिय वादळाची निर्मिती होईल. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यामुळे भारताचे दक्षिण भागातही बाष्पयुक्त वारे शिरकाव करतील. त्यामुळे हवामान ढगाळ राहील. त्याचा एकूण तापमानावर परिणाम होऊन रात्रीच्या तापमानात थोडीफार वाढ होईल. (रामचंद्र साबळे)
हे चक्रिय वादळ गुरुवारी (ता.२७) आंध्र किनारपट्टीजवळ असेल आणि सोमवारला (ता. १ डिसेंबर) झारखंड आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर जाऊन धडकेल. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात हवामान ढगाळ राहील. ज्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र असेल तेथे अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल असा अंदाज साबळे यांनी वर्तवलाय…
मात्र गारपिटीची शक्यता कमी राहील. कारण बंगालचे उपसागरातून येणारे वारे अतिथंड नसतील. हिंदी महासागराच्या व बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याने बाष्प निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा हवामान बदल जाणवत आहे. तर प्रशांत महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे विषुववृत्तीय भागातील तापमान पेरुजवळ १५ अंश सेल्सिअस व इक्वेंडोरजवळ २२ अंश सेल्सिअस इतके कमी असून तिकडे हवेचे दाब अधिक असल्याने ‘ला-निना’ परिणामामुळे इकडचे बाष्पयुक्त वारे तिकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बंगालच्या उपसागरावर लहान चक्रीवादळाची निर्मितीमुळे सर्व बाष्प हे दक्षिण भारताचे दिशेने येत राहील.
या वादळाची तीव्रता आठवडाअखेर कमी झाल्यानंतर पुन्हा थंडीत वाढ होईल. हवामान ढगाळ राहण्यामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भावासाठी पोषक स्थिती राहील अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.